सोलापूर (वृत्तसंस्था) – उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याच्या निर्णयाला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती देऊन तो आदेश रद्द करण्याची सूचना केल्याचे सांगितले. मात्र, त्याला आज चार दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा कुठलाही लेखी अध्यादेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे या ठिकाणीही त्यांची दिशाभूल जाणवू लागली आहे. हा वाद मोठया प्रमाणात पेटला होता. यासाठी आंदोलन देखील केलं गेलं होतं.
उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा आदेश येत्या ता. 25 मे पर्यंत न निघाल्यास जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवास स्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला.
खुपसे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील हक्काच्या उजनी जलाशयातील पाणी हे ‘सांडपाणी’ या गोंडस शब्दाचा वापर करून ता. 22 एप्रिल रोजी पाणी पळविण्याचा निर्णय झाला. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आक्रमक झाले आणि जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला.
शेतकऱ्यांच्या व शेतकरी नेत्यांच्या आक्रमकपणामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र, मंत्री जयंत पाटील यांनी ते वक्तव्य करून जवळपास चार दिवस उलटले आहेत. तरीही याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही.
ज्याप्रमाणे ‘सांडपाणी’ हा शब्द वापरून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली व सोलापूरकरांना वेड्यात काढण्याचा निरर्थक प्रयत्न केला. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घेऊन माध्यमांसमोर व्हिडिओ देऊन पुन्हा एकदा दिशाभूल करू नका. येत्या पाच दिवसांत म्हणजे २५ मे पर्यंत हा अध्यादेश निघाला नाही, तर जयंत पाटील यांच्या निवास स्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खुपसे यांनी दिला आहे.







