मुंबई (वृत्तसंस्था) – तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी सरकारवर फडणवीस यांनी टीका केली आहे. हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून मिळालीच नाही, आता तरी मदत मिळावी, असं फडणवीस म्हणाले आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘या चक्रीवादळाचा लॅंड फॉल हा गुजरातमध्ये झाला. यात ४५ जणांचा मृत्यू झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात गावे उध्वस्त झाली आहेत. म्हणून याची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. यानंतर त्यांनी १००० कोटींची मदत जाहीर केली. त्यांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये असं लिहिलं आहे की, इतर राज्यांनीही मदत केली जाणार आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्याचं नुकसान झालं आहे’.
‘कालची घोषणा झाल्यानंतर इतर राज्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यांनी ती प्रेस नोट वाचली आहे. केंद्र सरकार सगळ्या राज्यांना मदत करणार आहे. तसेच, केरळ, तामिळनाडू भाजपची राज्य नाही आहे. तसेच, गोवा आणि कर्नाटक ही भाजपची राज्य आहेत. पण काल केवळ गुजरातला मदत जाहीर केली. या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे’.
‘दरम्यान, SDRF मधून जी रक्कम राज्य अशा स्थितीत वापर करतं त्याची रक्कम NDRF कडून नंतर परत केली जाते. या सगळ्याची राज्याला माहिती असूनही जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. त्यामुळे इतर राज्यांना मदत मिळेल तशी महाराष्ट्राला देखील केंद्राकडून नक्की मदत मिळेल’, असे देवेंद्र फडणवीस यानी म्हटले आहे. यावरून नाव न घेता त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सुनावलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला 1000 कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला 1500 कोटींची मदत दिली पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण देशात लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी 1500 कोटींची मदत देतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे 1500 आणि 500 कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.