टोकियो:- कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जपानमधील डॉक्टर संघटनेच्या एका गटाने टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी केली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ऑलिम्पिकमधील स्वयंसेवक यांनीही याआधी ऑलिम्पिक रद्द करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. ऑलिम्पिक आयोजनासाठी जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी उरलेला असताना जपानमधील कोरोनाची परिस्थिती बिकटच होत चालली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आयोजनाबाबतचा स्थानिक पातळीवरील विरोध वाढतच चालला आहे.
जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट
टोकियोमध्ये जवळपास 6 हजार डॉक्टरांची सदस्यसंख्या असलेली संघटना कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी झटत आहे.
आम्ही कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहोत. आतापर्यंतची ही जपानमधील सर्वात मोठी लाट आहे. कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने फैलावत असून, या महामारीमुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑलिम्पिक रद्द करणे हाच योग्य पर्याय ठरेल, असे डॉक्टर संघटनेचे म्हणणे आहे.गतवर्षीच ऑलिम्पिक घ्यायला हवे होते
गतवर्षी जपानमध्ये कोरोना महामारी आटोक्यात होती. कमी संसर्ग असताना आपण गतवर्षी टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलले; मात्र आता कोरोनाचा हाहाकार सुरू असताना आपण या स्पर्धेच्या आयोजनाचा अट्टहास करत आहोत हे अत्यंत चुकीचे आहे. जपानी नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्याचे आमच्यापुढे मोठे आव्हान आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल आणि जपानला याचे मोठे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे सरकार आणि स्पर्धा आयोजक यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी (आयओसी) चर्चा करून ऑलिम्पिकचे आयोजन रद्द करायला हवे, अशी मागणी डॉक्टर संघटनेने केली आहे.