मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा संकट काळात जो तो आपापल्या परीने जमेल तशी मदत देऊ करत आहे. या मदतकर्त्यांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा देखील समावेश आहे. सोमवारी (१७ मे २०२१) सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांची भेट घेतली. हि भेट स्टालिन यांच्या चेन्नईतील कार्यालयात झाली. कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेसोबत भारत झुंज देत आहे. त्यामुळे या लढ्यासाठी रजनीकांत यांनी मुख्यमंत्री मदत निधीत ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. देणगी दिल्यानंतर त्यांनी बाहेर प्रतीक्षेत असणाऱ्या माध्यमांना संबोधित केले.
माध्यमांशी बोलताना त्यांनी दिलेल्या निधीविषयी माहिती दिली. सोबत म्हणाले, ‘जर तामिळनाडूच्या लोकांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व नियमावलीचे पालन केले, तरच कोरोनाला पराभूत करता येईल !! काळजी घ्या व सुरक्षित राहा असे आवाहन केले. सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांच्याही आधी अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत जमा केली आहे. यात भली मोठी यादी आहे. या यादीत दाक्षिणात्य अभिनेता शिवकार्थिकेयन, चिया विक्रम आणि दिग्दर्शक वेत्री मारन यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.
तर अन्य अनेक कलाकार आपले नाव चर्चेत न आणता गरजूंसाठी कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर हे सारे मिळून वारंवार आपल्या चाहत्यांना मास्क लावण्याचे व शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत.