मुंबई ( वृत्तसंस्था) ;- रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. रविवारपासून चक्रीवादळाचं स्वरूप तीव्र होत असल्याचं दिसून येत होतं.आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे.
केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं हळूहळू सरकू लागलं आहे. वादळाचा वेग ताशी २० किमी असून, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
१२ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ८९६, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.