नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांनी यंदा विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यामुळे सरकारने किमान आधारभूत किमतीत अन्नध्यान्याची विक्रमी खरेदी केली असून गत वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक गहू खरेदी एमएसपीवर करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
सरकारने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून याचा १० कोटी शेतकऱ्याना लाभ होणार असल्याचे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले, या योजनेचा लाभ पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
कोरोना हा देशाचा अदृश्य शत्रू आहे. त्याच्याशी आपण लढत आहोत औषधे, आवश्यक पुरवठ्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी.
पंतप्रधान किसन सन्मान योजनेवर शेतकरी खूप खुश आहेत विशेषतः पंजाबमधील शेतकरी. सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी टाकलेले समाधानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, देशात १० हजार शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्यात येत असल्याचे मेघालयातील एका शेतकऱ्याने मोदींना यावेळी सांगितले.
पंतप्रधान किसान सन्मान योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये अर्थ सहाय्य दिले जाते. या योजनेच्या काही लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वार्तालाप केला. आंध्र प्रदेशातील एका शेतकरी महिलेने बरड जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतर केले या शेतकरी महिलेशी संवाद साधत तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण घालून दिले आहे. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या क्षमता आणि अनुभवाबद्दल बोलतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.