मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. या लाटेत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. या भयंकर काळात जो तो प्रत्येकाकडे मदतीच्या आशेने पाहत आहे. या महामारीच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी मदतीसाठी हात स्वखुशीने पुढे केला आहे. अशात बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा- जोनास देखील आपल्या देशाच्या मदतीसाठी धावून आली आहे. तिने कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. तिने हे आवाहन केल्यानंतर १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी मिळून १० लाख डॉलरची मदत केली आहे. प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची महिती जाहीर केली आहे.
अभिनेत्री प्रियंका चोप्रा- जोनासने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने जगाचा नकाशा आणि ज्या देशांनी भारताला मदत केली आहे ते देश दाखवले आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना प्रियंका म्हणाली, ‘आपल्या इतिहासात सर्वात काळ्या दिवसांत, माणुसकीने साध्य केलं आहे, की एकजुटीने सर्व काही शक्य आहे. तुम्ही केलेल्या मदतीमुळे मी आणि निक आनंदी आहोत. ‘१४ हजारपेक्षा जास्त लोकांनी या कठीण काळात १० लाख डॉलर जमा करण्यासाठी मदत केली आहे. मिळालेली सर्व मदत ऑक्सीजन कंसंट्रेटर, वॅक्सीन आणि अन्य गरजेच्या वस्तूंसाठी वापरण्यात येत आहेत.’ शिवाय या महामारीवर मात करण्यासाठी ३० लाख डॉलर जमा करण्यासाठी प्रियंका आणि निक सध्या अतोनात प्रयत्न करत आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा- जोनास तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशन सेन्समुळे अत्यंत ट्रोल होत असते. नुकतेच तिने देवी महाकालीची प्रतिमा जॅकेट स्वरूपात परिधान केल्याचा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमुळे ती देवाचा अपमान करतेय. तसेच ती हिंदूंच्या भावना दुखवतेय असे गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आले. इतकेच नव्हे तर देव म्हणजे फॅशनचे साधन नव्हे अश्या शब्दात तिच्या ड्रेसिंगचा निषेध देखील करण्यात आला होता. या प्रकरणामुळे अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केले होते. मात्र तरीही प्रियांका आपले भारतीय असण्याचे कर्तव्य विसरली नाही. उलट तिच्यासोबत तिचा पती निक जोनास देखील आर्थिक साहाय्य मिळावे म्हणून प्रयत्न जाताना दिसतोय.