गाझीयाबाद – उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील एका पुठ्ठ्याच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. बुलंदशहर रोडवरील इंडस्ट्रीयल एरियातील एका केमीकल कंपनीत ही आग लागली. त्यानंतर, शेजारील इतरही कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. सुरुवातीला आग लागताच केमिकलचे ड्रम फुटल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तेथे धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्यात येत आहे.
बुलंदशहर रोडस्थित कवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफ-23 मिथाईल पिगमेंट कंपनीत ही आगीची दुर्घटना घडली. त्यानंतर, या आगीने रौद्र रुप धारण केले असून शेजारील दोन कंपन्यांनाही या आगीची झळ सोसावी लागली आहे. आग लागलेली कंपनी केमिकल उत्पादनाशी निगडीत असल्याने आगीचे स्फोट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे, दूरपर्यंत आगीच्या धुराचे लोट पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.








