मुंबई (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. एकीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारच्या अपयशाबाबत काँग्रेसकडून चांगलाच हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आता केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी चिदंबरम यांनी केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री यांनीही राजीनामा द्यावा, असे सांगितलं आहे.
देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे झालेल्या मृत्यूला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे आता विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून आरोप केले जाताहेत. वेळीच जर उपाययोजना केल्या असत्या तर कोरोनाचा प्रसार झाला नसता, असंही म्हंटल आहे. या कोरोनाच्या वाढत्या मृत्यूच्या प्रमाणावरून आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम आक्रमक झाले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी केली आहे. तर देशाचे केंद्र सरकारने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.