मुंबई (वृत्तसंस्था) – देशभरात करोनाने होणाऱ्या मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कारागृहांमध्ये करोनाने शिरकाव केला असून अनेक गुन्हेगार शिक्षा भोगत असतानाच करोनाचा बळी ठरत आहेत. आता अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं होतं. छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.
26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती. त्यामुळं तो तिहार कारागृहात शिक्षा भोगत होता.
छोटा राजन याच्या विरोधात सुमारे 71 खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी आतापर्यंत चार गुन्ह्यांचा निकाल लागला आहे आणि या चारही गुन्ह्यात छोटा राजन याला दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.