जळगाव;- रामेश्वर कॉलनीतील रेणुकानगरात रेखा पिंटू भालेराव (वय 40, मूळ रा. जळके, ता. जळगाव) या मजुरी करणार्या महिलेच्या घराला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली होती. त्यात काही मिनिटांत संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली. या घटनेनंतर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर.कुलभूषण पाटील व नगरसेवक श्री.प्रशांत नाईक यांनी तत्काळ तेथे भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी संबंधित महिलेकडून केला जाणारा आक्रोश उपस्थित सर्वांचेच मन हेलावून टाकणारा होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावत आज६ रोजी सकाळी रेणुकानगरात जाऊन श्रीमती भालेराव यांची भेट घेऊन महापौर सौ.जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी त्यांच्याकडे संसारोपयोगी वस्तू सुपूर्द करीत माणुसकीचा हात पुढे केला अन् श्रीमती भालेराव यांच्या चेहर्यावर हास्य फुलविले. महापौर सौ.महाजनांकडून राजकारणाबरोबरच समाजकारणाची जबाबदारीही तितकीच यशस्वीपणे पार पाडली जात असल्याचे पाहून मेहरुणवासीयांनी समाधान व्यक्त केले.








