नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशाचे ज्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते त्या पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा तृणमूलने सत्ता काबीज करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, भाजपच्या एका खासदाराने मात्र ममता बॅनर्जी आणि त्यांच्या विजयावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर क्रूर महिलेला पुन्हा सत्तेवर आणून पश्चिम बंगालच्या मतदारांनी ऐतिहासिक चूक केल्याची टीकाही सुप्रियो यांनी केली. रविवारी मतमोजणी सुरू असताना ममता बॅनर्जी या पुन्हा सत्तेवर येणार हे स्पष्ट झाल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली.
‘मी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देणार नाही किंवा मी जनादेशाचा आदर करतो असंही म्हणणार नाही.भाजपाला संधी न देऊन बंगालच्या जनतेने भ्रष्ट, असमर्थ, अप्रामाणिक सरकार आणि एका क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली आहे’, अशी पोस्ट सुप्रियो यांनी केली.
‘कायद्याचं पालन करणारा नागरीक म्हणून एका लोकशाही असलेल्या देशातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाचे मी पालन करेन’, असेही सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले. थोड्याच वेळात या पोस्टवरुन टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर मात्र त्यांनी ही फेसबुक पोस्ट डिलिट केली.







