नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोना धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरही ताण येत आहे. अनेक डॉक्टर रात्रं-दिवस रुग्णांवर उपचार करत आहेत. पण, दुसरीकडे रुग्णांना मरताना पाहू शकत नाही; असे म्हणत डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती आहेत.

कामाचा ताण असह्य झाल्याने दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. विकास रॉय असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. ते महिनाभरापासून आयसीयूमध्ये कार्यरत होते. ते मूळचे उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचे रहिवासी होते. गेल्या महिनाभरापासून डॉ. रॉय यांची ड्युटी आयसीयूमध्ये होती. रॉय दररोज सात ते आठ रुग्णांना सीपीआर देत होते. मात्र, त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अनेकजण वाचू शकले नाहीत. या परिस्थितीमुळे रॉय यांच्यावर ताण आला. त्यांनी ही गोष्ट मनाला खूप लावून घेतली होती, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून काम करताना डॉ. रॉय यांनी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. गेल्या नोव्हेंबरमध्येच रॉय यांचा विवाह झाला होता. त्यांची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती आहे. डॉ. रॉय यांनी उचललेल्या धक्कादायक पावलामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. डॉ. रॉय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्समध्ये पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना संकटात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर किती ताण आहे हेच या दुर्दैवी घटनेतून अधोरेखित झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडेकर यांनी म्हटले आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे डॉक्टरांवर असलेला मानसिक ताण खूप मोठा आहे. कोरोना संकटाशी आघाडीवर राहून दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे चित्र देशभरात दिसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.







