अहमदनगर (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधाही अनेकांना मिळत नाही. त्यावरून विरोधकांकडून सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर वक्तव्य केले.
हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर येथे आढावा बैठका घेतल्या. त्यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम झाले. लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढला. परिणामी, यंत्रणांवर ताण आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर होण्यास आपल्या सर्वांचा गाफीलपणा जबाबदार आहे. नागरिकांनी आता स्वत:च्या आणि इतरांच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे. विनाकारण बाहेर पडणारे नागरिक संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे आता गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करुन रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले गेले पाहिजे’.
तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपण आवश्यक ती काळजी घेतली नाही. त्यासाठी उपाययोजनाही केल्या नाहीत. आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळीही आपण या उपाययोजना करू शकलो नाही, तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो, असेच म्हणावे लागले. तसेच कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामदक्षता समिती आणि प्रभाग समित्यांनी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांबाबत कडक धोरण अवलंबले होते. आता तीच पद्धत अवलंबली गेली तरच संसर्गाला आळा बसू शकेल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.







