पारोळा(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही अन्न व पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळेच पारोळा येथील नवतरुण मित्र मंडळाकडून माकडांची काळजी घेतली जात आहे. कोरोनोमुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू झाला आणि हातावर पोट असणाऱ्या माणसांप्रमाणेच प्राण्यांचाही पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कन्नड घाटात म्हसोबाचे पुरातन मंदिर आहे. मात्र सर्वच मंदिराप्रमाणे हेही मंदिर प्रशासनाने बंद केले. या मंदिर परिसरात नेहमीच चारशे ते पाचशे माकडांचा वावर असतो. तसेच गौताळा घाटातील देखील माकडे या ठिकाणी कायमस्वरूपी मुक्कामी असतात. साहजिकच वाहतूक बंद झाल्याने प्रवासी येणे बंद झाले आणि या माकडांना मिळणारे अन्नही थांबले गेले. त्यामुळे या माकडांच्या पोटाचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे पारोळा शहरातील नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने माकडांना केळी, टरबुज खायला दिली. त्याचबरोबर त्यांच्यासाठी पाण्याचीही व्यवस्था ही करण्यात आली आहे. माणसांना सगळीकडेच मोठ्या प्रमाणात मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या मुक्या प्राण्यांची होणारी अवहेलना लक्षात घेऊन नवतरुण मंडळाने हा उपक्रम राबवला असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले.
हा उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करण्याचा मंडळाचा मानस असून त्यात आलोक पवार,पंकज सपकाळे,छोटू वाणी, दिपक फ्रुटवाले यांचे सहकार्य लाभले असून सागर वायरमन, संदिप पवार,गोलू ,तेजस श्रीवास्तव, अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले.







