नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- करोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. देशात मृत्यूचं तांडवच सुरू असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा लागलेल्या दिसत आहेत. करोनाचं थैमान कायम असल्याचंच गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून दिसत आहे. देशात अवघ्या २४ तासांत साडेतीन हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज देशातील मागील २४ तासांतील रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जाते. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशवासीयांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.







