नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीच्या दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीनेयासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.
त्यामुळे आता भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना लसीकरणाची रणनीती बदलली जाणार का, हे पाहावे लागेल. देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.








