मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण यामध्ये आता लसींचा तुटवडा हीच सगळ्यात मोठी समस्या असल्याचे बोलले जात आहे. पण या समस्येवर उपाय म्हणून कानपूर IIT ने सरकारला मदतीचा हात दिला आहे.
ICMR आणि कानपूर IIT मिळून आता ड्रोनद्वारे लसींचा पुरवठा करता येऊ शकतो का यावर संशोधन केले जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. यासंदर्भातल्या संशोधनाला परवानगी देण्यात आली आहे आणि वर्षभर हा अभ्यास सुरू राहिल असेही सांगण्यात आले आहे.
या अभ्यासासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानेसुद्धा परवानगी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करत ड्रोन वापराच्या नियमांमध्ये या अभ्यासासाठी सूट दिली आहे. ड्रोनद्वारे लसींचा पुरवठा करता येऊ शकतो का यावर संशोधन करण्यासाठी बंगळुरुच्या सीडी स्पेस रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तसेच भारत बायोटेकची मदत घेतली जाणार आहे.
ड्रोनद्वारे लसींचा पुरवठा झाला तर नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध होऊ शकेल तसेच दुर्गम भागांमध्येही याचा फायदा होऊ शकतो. पण आता केवळ ही सुरूवात आहे, ड्रोनद्वारे लसीची डिलीव्हरी कितपत शक्य आहे हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे.