मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘निर्दयी मात्यापित्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ;- हुडको परिसरातील गुलशन रजा कॉलनी भागात राहणाऱ्या एका ११ वर्षीय बालिकेचा सातत्याने छळ , मारहाण आणि उपाशी ठेऊन अपशकुनी असल्याचा ठपका निर्दयी बापाने ठेवल्याने तिचा मृत्यू ओढवला होता . बुधवारी परस्पर कब्रस्तानात पुरलेला मृतदेह काढून पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. यात मुलीला मारहाण , उपाशी ठेव्यासारखा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने निर्दयी मात्यापित्यांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
कानिज फातेमा वय ११ हिला अपशकुनी असल्याचे समजून गेल्या २ वर्षांपासून सतत मारहाण करून अर्धवट जेवण अथवा उपाशी ठेवण्यात येत होते . यातच २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता राहत्या घरात कनीजचा मृत्यू झाला. शेख दांपत्याने कोणास काही एक न सांगता दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचा दफनवीधी उरकून दोघे बेपत्ता झाले होते.कनीजचा मामा अजहर व नाना-नानी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.त्यानुसार बुधवारी कनीजचा मृतदेह कबरमधून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. वैभव सोनार यांच्यासह पथकाने या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, कनीजच्या पोटात अन्न-पाणी नव्हते. कुपोषण, भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले.
कनीजची आई, नाजिया परवीन हिला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली होती. तिने दिलेल्या जबाबानुसार, कनीजच्या जन्मानंतर तिची आजी (जावेद अख्तरची आई) हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर दोन वर्षांनी जावेदच्या मेडिकल दुकानास आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनांमुळे जावेद याने कनीजला अपशकुनी असल्याचा समज करून घेतला. तेव्हापासून तो कनीजला मारहाण करीत होता.शवविच्छेदन केल्यानंतर सर्व प्रकार उजेडात अाला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कनीजचे वडील जावेद व आई नाजिया परवीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.







