मुंबई (वृत्तसंस्था) – उंब्रज – पाल (ता.कराड) येथील श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्यावतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपये आणि ससून हॉस्पिटल पुणे यांना एक लाख रुपये असा एकूण सहा लाख रुपयांचा निधी आरटीजीएस व्दारा वर्ग करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन देवराजदादा पाटील यांनी दिली.संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात आहे. तर महाराष्ट्रावरही बिकट प्रसंग ओढावला आहे. याच पार्श्वभूमीवर पाल देवस्थान ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता व ससून हॉस्पिटल पुणे यांना आरटीजीएस व्दारे मदत निधी वर्ग करण्यात आला आहे. नागरिकांनी करोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉकडाऊन व संचारबंदीचे पालन करावे. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन देवराज पाटील यांनी केले आहे.दरम्यान, गावातील मागासवर्गीय व गोरगरीब तीनशे कुटुंबियांना जीवनावश्यक अन्न धान्याचे वाटप देवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.