नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार परदेशातून नवी दिल्ली येथे आलेल्या आणि क्वारंटाईन होण्यास सांगितलेल्या परंतु आता क्वारंटाईन कालावधी संपला आहे आणि त्यांना आरोग्य विभागाने घरी जाण्यास मान्यता दिली आहे अशा महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांची लॉकडाऊन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सदन येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी दिली आहे. ते म्हणाले की विविध देशातून महाराष्ट्रात जाण्यासाठी आलेले नागरिक होम क्वारंटाईनमुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे राज्यात परत जाऊ शकले नाहीत यात इटलीहून परतलेले १५ विद्यार्थीही आहेत. या सर्वाची लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत महाराष्ट्र सदनात व्यवस्था करण्यात आली आहे. काही जण राहण्यासाठी सदनात आले देखील आहेत. उर्वरित लोक त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर आरोग्य विभागाच्या मान्यतेने सदनात दाखल होणार आहेत असेही ते म्हणाले. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील रहिवाशांची अशा पद्धतीने नवी दिल्ली येथे व्यवस्था करणारे महाराष्ट्र सदन हे एकमेव सदन ठरले आहे अशीही माहिती त्यांनी दिली.