नवी दिल्ली ( वृत्तसंस्था) ;- देशात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत असून पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात ३ लाख१४ हजार ८३५ रुग्ण सापडले आहेत, तर २ हजार १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा नवीन स्ट्रेन अधिक आक्रमकपणे आणि वेगाने पसरत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती बिकट होत आहे. बेड, ऑक्सिजनची कमतरता भासत असून यामुळे रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांचा आकडाही फुगत चालला आहे.

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर गेला होता, मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा दर आता 85.01 टक्क्यांवर आला आहे. सध्या देशात 22 लाख 91 हजार 498 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीकरणाचा कार्यक्रम अधिक वेगवान करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 लोकांना लस देण्यात आली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लसीकरण वेगाने होत असून सर्वात कमी कालावधीत 13 कोटी लोकांना लस देण्याचा विक्रम केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यात गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यानुसार शहर व जिल्हांतर्गत प्रवासावर निर्बंध आणण्यात आले असून केवळ सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, रुग्ण यांनाच लोकलने प्रवास करता येणार असून सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही. बसमध्येही केवळ 50 टक्केच प्रवाशांना प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी कार्यालयांत केवळ 15 टक्केच कर्मचाऱयांची उपस्थिती राहणार असून जिल्हांतर्गत प्रवासात 14 दिवस होम क्वॉरंटाइनचा स्टॅम्प मारला जाणार आहे.







