लखनऊ: गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच आता केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर योगी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना लसीकरण मोफत केले जाणार आहे.

देशातील कोरोना लसीकरण मोहीम व्यापक करण्याच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशमधील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालल्याचे पाहायला मिळत असून, तेथे वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.







