नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- देशात करोनाने कहर केला असताना आरोग्य सुविधांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. करोनाची दुसरी लाट येणार असल्याचे माहिती असतानाही सुविधा निर्माण करण्यात का आल्या नाहीत? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. तसेच लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा जाणवत असल्याचं सांगताना देशवासियांना प्राधान्य का देण्यात आलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
‘आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे रिपोर्ट येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे. मग ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही,’ अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.