चाळीसगाव;- तालुक्यातील खेरडे (सोनगाव) येथे एका मुलीला सतत तीन टवाळखोर अश्लील हावभाव करत असल्याने त्यांच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून युवतीने अखेर विष प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील खेरडे (सोनगाव) येथे एका मुलीला विशाल एकनाथ जाधव, विलास पुरणदास चव्हाण व पप्पू चरणदास चव्हाण (सर्व रा. खेरडे सोनगाव) हे तीन तरूण हे गेल्या पंधरा दिवसांपासून अश्लील चाळे करून शारीरिक व मानसिक छळवणूक करत होते. रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या तिघांनी सदर मुलीच्या घरासमोर उभे राहून हातवारे करत इशारा केला.
यामुळे मुलीने या त्रासाला कंटाळून हे विषारी औषध प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्राणज्योत मालवली. याबाबत गोरख चना राठोड (वय-४९) रा. खेरडे (सोनगाव) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०५ नुसार आज दुपारी वरील आरोपी तीघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत







