जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड-19 (कोरोना रुग्णालय) रूग्णालय म्हणून घोषीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जाहिर केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सद्यःस्थितील दाखल रुग्णांपैकी ज्यांना घरी सोडणे शक्य असेल अशा रुग्णांना परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने त्यांना वाहन व्यवस्था करून त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. तथापि, जिल्हा सामान्य रुग्णालयापासून रुग्णांना त्यांच्या घरापर्यंतचे भाड्याची रक्कम स्वत: अदा करावी लागेल. ज्यांना घरी सोडणे शक्य नसेल अशा रुग्णांना डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण स्थलांतरीत व डिस्चार्ज झाल्यानंतर रुग्णालयात कोरोनाचे संशयीत आणि पॉझेटिव्ह रुग्ण दाखल करून घेण्याआधी संपूर्ण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी संबंधितांना दिल्यात.याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अिधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी पुढे सांगितले की, कोरोना संशयीतांचे चाचणीसाठी पाठवायचे नमुने दररोज सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यान संकलीत करून 11.00 वाजेला पुढील कार्यवाहीसाठी पाठवावेत आणि तसा अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा. कोरोनासारख्या विषाणूचा जिल्हा प्रशासन प्रभावीपणे सामना करीत असताना आरोग्य खात्यातील काही कर्मचारी बेकायदेशीररित्या गैरहजर आहेत. त्या सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांना आरोग्य प्रशासनाने कामावर तात्काळ हजर होण्याविषयी कळविले असूनही जे कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्या जागेवर ग्रामीण रूणालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तसेच कोरोना संबंधित रुग्णांकडून केस पेपरसह कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येवू नये अशा सूचनाही डॉ. ढाकणे यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
आरोग्य प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा ड्युटी चार्ट दररोज जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा. शिवाय याकामी आरोग्य विभागाच्या व्यतीरिक्त अन्य विभागातूनही 400 ते 500 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येईल ते कर्मचारी जनजागृती, याद्या तयार करणे, विलगीकरण भागाची माहिती अद्ययावत ठेवणे इत्यादि कामे करतील. शहरातील तसेच जिल्ह्यातील दाटी-दाटीच्या वस्त्या, झोपडपट्या अशा ठिकाणी निर्जंतूकीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचनाही सर्व संबंधितांना देण्यात आल्यात.