मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी म्हणजे आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन केलं आहे. रात्री 9 वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मोदींच्या या आवाहनानंतर देशभरातून अनेकांनी टीका केली आहे. तरी अनेकांनी या निर्णयाचं स्वागत देखील करत आज लाईट बंद करणार असल्याचं सांगितलं आहे.
रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यामुळं चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. या कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या महामारीने सर्वाधिक गोरगरीब प्रभावित झाले आहेत. या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे. 5 एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाळा महाशक्तीचं जागरण करायचं आहे. मोदी म्हणाले होते की, हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे. हे आयोजन करताना कुणीही एकत्र यायचं नाही. रस्त्यावर, गल्लीत एकत्र जमायचं नाही. त्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन ही गोष्ट करायची आहे. आपल्या दारात, बाल्कनीत उभं राहून हे करायचं आहे, असं मोदी म्हणाले.
9 मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्ती केली होती. त्यावर केवळ घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले आहे. बाकी रस्त्यावरील पथदिवे, घरातील इतर विद्युत उपकरणे चालूच राहतील, असं स्पष्टीकरण केंद्रीय उर्जामंत्रालयाने दिले आहे. असं केल्याने देश किंवा राज्य अंधारात जाण्याचा धोका नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे. यावेळी रस्त्यावरील दिवे, घरातील इतर सर्व विद्युत उपकरणे, रुग्णालय, पोलीस ठाण्यासह इतर महत्वाच्या ठिकाणी दिवे चालूच राहणार आहे. त्यामुळे ग्रीडमध्ये फ्रिक्वेन्सी फेल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.








