मुंबई (वृत्तसंस्था) – “राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होत चालली आहे. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला लस द्यावी,” अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

“राज्यात कोरोनाची स्थिती भीषण आहे. त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची मागणी केली आहे. आज याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व पक्षांची चर्चा केली जाणार आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचा आलेला साठा दोन दिवसात संपेल. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
“गृहविभाग परमबीर सिंग यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात जो दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं म्हणत या संपूर्ण प्रकरणात राजकारण होत आहे. NIA ची गुप्त चौकशी सुरु आहे. मग त्यांच्या कोठडीतून सचिन वाझेने लिहिलेले पत्र बाहेर कसे काय येतात?” असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितीत केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 58 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 301 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 45 हजार 391 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाख 88 हजार 540 वर पोहोचली आहे. त्यातील 26 लाख 95 ङजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 57 हजार 329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 34 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.







