मुंबई (वृत्तसंस्था) – वाझे प्रकरणात अनिल परब गोत्यात आल्यावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज शिवसेनेवर निशाणा साधत “.आता मानहानीची नोटीस कोण पाठविणार ?” असा खोचक प्रश्न केला आहे.
सध्या एनआयए वादग्रस्त एपीआय सचिन वाझे यांची चौकशी करून असून यातून अनेक स्फोटक माहिती समोर येत आहे. यात वाझे यांनी एका पत्राच्या माध्यमातून शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी देखील आपल्याला १०० कोटी रूपये जमा करण्यास सांगितले होते असे नमूद केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच लवकरच अनिल परब हे देखील अडचणीत येतील असा इशारा दिला असतांना वाझे यांचे पत्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता नेमक्या याच मुद्यावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, मी विचार करत होतो मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली आता नोटीस कोण बनवणार? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावरही शरसंधान केल्याचे दिसून येत आहे.







