कोलकत्ता (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोनारपूरमध्ये 3 एप्रिलला आयोजित पंतप्रधानांच्या सभेमधील हा फोटो होता. या फोटोमध्ये एक मुस्लीन तरुण मोदींच्या कानामध्ये काहीतरी सांगत असल्याचे आणि मोदी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन तो काय बोलतोय हे लक्षपूर्वक ऐकत असल्याचे दिसले होते. याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता या फोटोमधील तरुणाचे नाव जुल्फिकार अली असल्याचे समोर आले असून मोदींसोबत त्यावेळी नक्की काय चर्चा झाली हे देखील त्याने सांगितले आहे. ‘ नवभारत टाइम्स ‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
‘कदाचित काही लोक फोटोतील तरुण हिंदू मुलगा असेल असेही म्हणत असतील. मात्र मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मला हिंदूस्थानच्या सरकारने सर्टिफिकेट दिले आहे. माझे नाव जुल्फिकार अली असून माझ्या वडिलांचे नाव अब्दुस साजिद असे आहे’, असे जुल्फिकार अली प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला.
तो पुढे म्हणतो, पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकमी हे पोर्ट विधानसभा क्षेत्राला मिनी पाकिस्तान समजतात. मात्र जोपर्यंत आमच्यासारखे सच्चे हिंदुस्थानी नागरिक येथे आहेत तोपर्यंत या जागेला ना बांग्लादेश बनू देऊ, ना पाकिस्तान. तसेच जे लोक राष्ट्रहिताचा विचार करतात, कुटुंबाचा विचार करतात, देशाचा विचार करतात ते लोक या भागाला पाकिस्तान किंवा बांग्लादेश बनू देणार नाहीत, असेही जुल्फिकार म्हणाला.
जुल्फिकार म्हणतो, पंतप्रधान मोदींना लांबून पाहण्याची आणि त्यांना नमस्कार करण्याची माझी इच्छा होती. 3 एप्रिलच्या सभेला मी गेलो तेव्हा आमची कोरोना चाचणी झाली. मी हेलिपॅडजवळ उभा होतो. पंतप्रधान मोदी माझ्यासमोरून जाणार म्हणून मी खूप उत्साहित होतो. माझ्या शेजारील व्यक्तीने मला नमाजी टोपी घालण्यास सांगितले. मोदी हेलिकॉप्टरमधून उतरले आणि गाडीमध्ये बसून येत असताना मी त्यांना सलाम केला. मोदींनीह मला सलाम केला. त्यानंतर ते गाडीतून उतरले आणि माझ्याजवळ आले.
मोदींनी मला माझे नाव विचारले. हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या आवाजामुळे त्यांना कदाचित ऐकू गेले नाही. त्यामुळे मी त्यांच्या कानात माझे नाव सांगितले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तुला काय बनायचे आहे असे मला विचारले. मी देखील त्यांना राष्ट्रहितासाठी काम करायचे आहे, असे म्हटले. मला त्यांच्यासोबत एक फोटो हवा होता. मी माझ्या मोबाईलकडे हात नेला, मात्र मोदींनी आपल्यासोबत असणाऱ्या फोटोग्राफरला इशारा केला आणि फोटो घेण्यास सांगितले. तसेच पुन्हा लवकरच भेटू असेही ते म्हणाल्याचे, जुल्फिकार याने सांगितले.







