मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना राज्यात लॉकडाऊन लागणार का याचे उत्तर आता दोन दिवसांनीच मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत कडक निर्बंध आणणार असे सांगतानाच, ही लढाई पुन्हा एकदा लढण्यासाठी, जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही आज राज्यातील जनतेला केले.
लॉकडाऊनच्या शक्यतेने रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱया राजकीय पक्षांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त ‘लस’ टोचली आणि आता रस्त्यावर उतराच, पण ते लॉकडाऊन होऊ नये म्हणून उतरा. डॉक्टरांना, आरोग्य कर्मचाऱयांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा असे आवाहन केले. पृपया जनतेच्या जिवाशी खेळू नका, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना केली.
मी तुम्हाला घाबरवण्यासाठी आलेलो नाही, तर आताच्या बिकट स्थितीत मार्ग काढण्यासाठी तुमच्याशी संवाद साधतोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. गेल्या मार्चमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाच्या विषाणूने आता मायावी राक्षसासारखे रूप घेतले आहे. गेल्या वर्षभरात आपण सर्वजण हे युद्ध एकत्र हातात हात घालून लढलो. आताही या लढाईसाठी पुन्हा एकदा आपण तसेच सज्ज होऊया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. होळी झाली, धुळवडही झाली. तेथूनच ‘शिमग्या’ला सुरुवात झाली, असा विरोधकांना टोला हाणतानाच या शिमग्याला वेळ आली की जरूर उत्तर देईन, असा इशाराही त्यांनी दिला.
गेले वर्षभर प्रत्येकाने माझे ऐकले, त्याप्रमाणे ते वागले. धार्मिक नेते, राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते सर्वांनीच ऐकले. मात्र मधल्या काळात आपण शिथिल झालो. लढाईत हातातील शस्त्रे टाकली की काय असे वाटू लागले. लग्न, राजकीय मोर्चे, मेळावे, समारंभ सुरू झाले. कोरोना गेला अशारीतीने सगळे सुरू झाले. मात्र दुर्दैवाने जी भीती सगळे तज्ञ व्यक्त करीत होते ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्यावेळपेक्षाही अक्राळविक्राळ रूप धारण करून कोरोना आला आहे. मी मागे म्हणालो होतो, ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला लॉकडाऊन करावे लागेल. ती शक्यता टळलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन आज जाहीर करीत नाही आहे, पण इशारा देतो आहे, असेही ते म्हणाले.
आतापर्यंत भगवान विष्णूने अवतार घेतल्याचे ऐकले होते, वाचले होते. विष्णूचे आपण पूजनही करतो. संकटांचा नायनाट करण्यासाठी विष्णूने अवतार घेतले. मात्र कोरोना नावाचा हा विषाणू अवतार घेऊन आपल्याला संकटात टाकतोय. आपली जणू परीक्षाच घेतोय, म्हणूनच पुन्हा एकदा आपण सर्वांनी धैर्याने लढण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राने एकसुद्धा रुग्ण लपवला नाही, लपवणार नाही. बिहारसह अनेक राज्यांत निवडणुका झाल्या, निवडणुका आहेत. तेथे रुग्ण का सापडत नाहीत याबद्दल मला काही बोलायचे नाही; पण आम्ही सत्य लपवणार नाही. महाराष्ट्रातील स्थिती धक्कादायक वाटत असली तरी सत्य काय आहे तेच सांगतोय आणि सांगणार. मला पुणीही कितीही व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तरी मी माझे काम करीत राहणार; कारण मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
गेल्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्या झपाटय़ाने होणाऱया रुग्णवाढीबद्दलही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला मुंबईत दर दिवशी 300-350 रुग्ण सापडत होते. आज ती संख्या महिनाभरात साडेआठ हजारांवर गेली आहे. महाराष्ट्रात 17 सप्टेंबर 2020 रोजी 3 लाख सक्रिय रुग्ण होते. त्या दिवशी एका दिवसात 24,600 रुग्ण सापडले होते आणि मृत्यूची संख्या 31 हजारांवर होती. आता ती 54 हजारांवर पोहोचली असून आज एका दिवशी 43,183 रुग्ण सापडले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्याने आरोग्य सेवांमध्येही वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपलब्ध आरोग्य सेवांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. राज्यात सध्या विलगीकरण कक्षांमधील बेड्सची संख्या 2 लाख 20 हजार असून त्यातील 62 टक्के म्हणजेच 1 लाख 37 हजार 549 भरलेले आहेत.
आयसीयू बेड 20 हजार 519 असून त्यातील 48 टक्के भरलेले आहेत. ऑक्सिजन बेड्स 62 हजार असून त्यातील 25 टक्के भरलेले आहेत. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर बेड्स 9347 असून त्यातील 25 टक्के वापरात आहेत, अशी माहिती देतानाच ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा येत्या पंधरा-वीस दिवसांत कमी पडू लागतील. सुविधा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेड वाढवू, व्हेंटिलेटर्स मिळतील, औषधे आणि ऑक्सिजनचाही साठा आहे; परंतु डॉक्टर, नर्सेस कसे वाढवणार? आरोग्य कर्मचारी पुठून आणणार? असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
देशभरातील लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र नंबर वनवर आहे. ही समाधानाची गोष्ट आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गुरुवारी 3 लाख जणांचे लसीकरण केले. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत तब्बल 65 लाख जणांना आपण लस दिली आहे. केंद्र सरकारने लसींचा पुरवठा वाढवला तर दर दिवशी 6 ते 7 लाख जणांचे लसीकरण करण्याची आपली क्षमता आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आता मी तुमच्याशी बोलताना माझ्या आजूबाजूला कोणीही नाही म्हणून मी मास्क काढून बोलतोय. मात्र लस घेतल्यावरही मास्क घालणे अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांशी काही दिवसांपूर्वी संवाद साधला तेव्हाही त्यांनी हेच सांगितले होते की, लस घेतल्यामुळे कोरोना जाणार नाही, तर त्याची घातकता कमी होईल. धुवांधार पावसात छत्री डोक्यावर घ्यावी तसे लसीचे आहे. आता तर पाऊस नाही, वादळ आले आहे. तेव्हा लस घेतली तरी मास्क हा लावावाच लागणार हे विसरू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
सल्ले देण्यासाठी तज्ञ तयार झालेत. बोलणारे बोलतातच, पण रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणते उपाय करावेत हे मात्र कोणी सांगत नाही, असा टोला हाणताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सगळी यंत्रणा कोरोना लढय़ात उतरली आहे. एकाचवेळी उपचारही सुरू आहेत. रुग्णशोधही सुरू आहे आणि त्याचवेळी लसीकरणातही तीच यंत्रणा काम करीत आहे. अशा स्थितीत त्या कर्मचाऱयांची काय अवस्था होत असेल त्याचा विचार करायला हवा.
अमेरिकेने सात कलमी कार्यक्रम जाहीर केलाय. राजकारणापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, असं आवाहन केलंय. माझीही आपल्याकडील राजकीय पक्षांना विनंती आहे की, जनतेच्या जिवाशी खेळ नको. राजकारण करू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जगभरात कोरोना आणि लॉकडाऊनची स्थिती काय आहे याचीही माहिती त्यांनी जनतेला दिली. ब्राझीलमध्ये शुकशुकाट आहे. मृत्यू वाढतायत आणि बेरोजगारीही वाढते आहे. फ्रान्समध्ये तिसऱयांदा लॉकडाऊन केले आहे. हंगेरीत वर्प फ्रॉम होम, तर बेल्जियममध्ये महिनाभर लॉकडाऊन आहे. आयर्लंडमध्ये तर डिसेंबरपासून लॉकडाऊन सुरू आहे. यूकेमध्ये तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर आता पुठे त्यात शिथिलता आणली जात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.
कोरोनाविरोधातील लढाई पुन्हा एकदा लढण्यासाठी, जिंकण्यासाठी सज्ज व्हा असे जनतेला आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे युद्ध एकटय़ा-दुकटय़ाचे नाही. म्हणूनच सर्वजण जर पुन्हा जिद्दीने उतरलात तर कोरोना आपण रोखू शकतो. मी कोरोनाला रोखणारच हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. येत्या काही दिवसांत कडक निर्बंध लावावे लागतील. ते उद्या पिंवा परवा जाहीर होतील. काही नियम आधीच लागू आहेत. सगळय़ा ट्रेन तुडुंब भरून धावतायत. आपल्याला अनावश्यक गर्दी टाळावीच लागेल. जीव वाचवायचा की रोजगार? रोजगार आणता येतो, पण जीव आणता येत नाही हे लक्षात ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मी अजून काही जणांशी बोलतो आहे. लॉकडाऊन हा उपाय नाही, म्हणून मला वेगळा उपाय हवा आहे. संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण झाल्यानंतरही काही प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच या सगळय़ांपेक्षा मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही नियम पाळा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
मधल्या काळात आपल्याकडे सल्ला देणारे ‘तज्ञ’ तयार झाले आहेत. त्यांनी मते मांडली आहेत. मी कोणा पक्षाचे नाव घेणार नाही, राजकारणात मला पडायचे नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ‘तज्ञां’नी केलेली विधानेच वाचून दाखविली.
अनेकांना वाटते, मास्क का लावतोय? अरे, मास्क न लावण्यात शौर्य काय? मी मास्क वापरत नाही, असं म्हणणे यात शूरता कसली? असा टोला हाणतानाच मास्क वापरणे यात लाजण्याची काहीच गरज नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.
जे सांगतात लॉकडाऊन केला तर रस्त्यावर उतरू, त्यांनी जरूर उतरावे, त्यांनी रस्त्यावर उतरलेच पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. लॉकडाऊनच्या विरोधात नाही, तर डॉक्टर्सना मदत करायला तुम्ही रस्त्यावर उतरा. ज्या कुटुंबांमध्ये कर्त्याकरवित्यांचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावर उतरा. ज्या कुटुंबामध्ये सगळे कोरोनाबाधित झाले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी रस्त्यावर उतरा. आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा. कारण आपल्याला ही लढाई अशीच लढावी लागणार आहे. हातात हात घालून लढाई लढायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एका उद्योगपतीने सांगितले, लॉकडाऊनऐवजी आरोग्य सुविधा वाढवा. आपण गेल्या वर्षभरात आरोग्य सुविधा वाढविली आहे आणि अजूनही वाढवत आहोत. मी आरोग्य व्यवस्था वाढवतो. बेडस्ही वाढवतो, सगळं वाढवतो, पण पृपा करून मला रोज 50 नर्सेस आणि डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा. कारण आरोग्य सुविधा म्हणजे फर्निचरचे दुकान नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सल्ला देणाऱयांना फटकारले.