पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

याबाबत सौरभ राव म्हणाले, ‘परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील’.
बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.
पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.







