मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिलेला असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने याचा जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. राज्यात कडक निर्बंध लावावेत असा सरकारमध्ये सूर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता यासंबंधी बैठक पार पडणार आहे.

या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी राज्यात लॉकडाउन लागणार की कडक निर्बंध लावण्यात येतील हे स्पष्ट होणार आहे.
राज्यातील करोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारपुढे आहे. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन ऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.







