मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात लवकरच मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची चर्चा आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून काहीसा वेगळा असेल असं बोललं जात आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही, अशी सर्वाना धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे. मात्र, या लॉकडाऊनचं स्वरुप 50 टक्के लॉकडाऊन आणि 50 टक्के निर्बंध असे असतील असे बोलले जात आहे. शेवटी लॉकडाऊन लागणार कि नाही याबाबत शासनातर्फे अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
मागील वर्षी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पुढे हा लॉकडाऊन वाढत वाढत गेला. लॉकडाऊनच्या वर्षानंतरही अजूनही कोरोनाचं थैमान सुरुच आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक दोन दिवसापूर्वी पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयाबाबतही चर्चाहि झाली आहे. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.
आधीच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर या लॉकडाऊनमध्ये फक्त गर्दीची ठिकाणं बंद केली जातील. आता ही गर्दीची ठिकाणं कुठली तर शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह. थोडक्यात जिथं जिथं तुम्ही विरंगुळ्यासाठी जाता, ती सगळी ठिकाणं बंद केली जातील. मागील लॉकडाऊन हा सलग होता. म्हणजे, चोवीसतास सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आताच्या लॉकडाऊनला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. ती वेळ कदाचित सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतची असू शकेल. सध्या अनेक शहरात नाईट कर्फ्यू लावला जातो. त्यात धर्तीवर नाईट कर्फ्यू न लावता दिवसा कर्फ्यू लावण्याची तयारी प्रशासन करतंय. शिवाय हा लॉकडाऊन अगदी 5 किंवा 7 दिवसांचा असू शकतो, दीर्घ कालावधीचा लॉकडाऊन नसेल अशी प्राथमिक माहिती आहे.
रेल्वे स्टेशन्स, विमानतळं, बसस्थानकं इथं कोरोना चाचण्या करण्याचेही धोरण सरकारने ठरवले आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांना वेगळं करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शिवाय, लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केलं जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचा सरकार विचार करत आहे. एकूणच अर्थकारणाला फटका न देता, लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, हा लॉकडाऊन होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे.
नुकतीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारला लॉकडाऊनबाबत पूर्व सूचना देण्याची विनंती केली आहे. त्यांनी पत्राद्वारे सांगीतले कि, पहिल्या टप्प्याने खूप नुकसान झालंय. दुसऱ्यानेही होईल. त्यामुळे याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शासनाने काही उपाययोजना केल्या आहेत, तर काही केल्या नाहीत. लॉकडाऊन करु नये. लॉकडाऊन केलंच तर अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं. लॉकडाऊन कुणाला मजा येते म्हणून नाही, जीव वाचवण्यासाठी असतो. जीव की रोजगार हा प्रश्न असतो, पण जीव महत्त्वाचा असतो. लॉकडाऊन करायचा असेल, तर पूर्वसूचना द्यायला हवी,’ असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं आहे.