जळगाव (प्रतिनिधी) – सध्या संपुर्ण देश लॉक डाऊन असतांना काही लोक कोरोना रोगाच्या अनुषंगाने दोन धर्मात , दोन जातीत तेढ , तिरस्कार निर्माण होईल असे संदेश व मजकुर सोशल मीडियावर प्रसारीत करत असल्याचे समोर आले. अशा प्रकारे सोशल मीडियावरुन संदेश व्हायरल करणार्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील असा ईशारा पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिला आहे. या गुन्ह्यात संबंधितांना गंभीर शिक्षा होवुन कारावास भोगण्याची वेळ येवु शकते अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकरीता केंद्र , राज्य व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या विविध उपायोजनांची अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन दिवस – रात्र काम करत आहे . प्रामुख्याने कायदा सुव्यवस्था राखणे ही पोलीस विभागाची प्रमुख जबाबदारी आहे त्या अनुषंगाने सोशल मेडीया , फेसबुक व व्हॉट्सअप वरील संदेश व मजकुरावर पोलीस विभागाचे पूर्ण लक्ष असुन संबंधित प्रकाराबाबत उपविभागाकडील जळगाव तालुका , जळगाव शहर , जिल्हापेठ , एमआयडीसी , रामानंद नगर व शनिपेठ पोलीस स्टेशन यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश तसेच सुचना देण्यात आले असल्याचे डॉ. रोहन यांनी म्हटले आहे. दोन धर्मातील , दोन जातीतील तेढ निर्माण करणारे , जाती धर्मावर बहिष्कार टाकणेबाबत चिथावणी देणारे संदेश फेसबुक , व्हॉटसअप वरुन प्रसारीत करणे , त्यावर कमेंट करणे , स्टेटस ठेवणे असे प्रकार करुन नयेत असे केल्यास कायद्यानुसार गंभीर गुन्हे नोंद करण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कळविले आहे.