जळगाव (प्रतिनिधी) – येथील जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू तथा जैन फार्म फ्रेश फूडस् लि.च्या मसाला प्रकल्पातील सहकारी, स्वीमिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कारप्राप्त खेळाडू कांचन चौधरी यांनी बंग्लोर येथे नुकत्याच झालेल्या ‘पॅरा स्वीमिंग चॅम्पीयनशीप’ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी 3 सुवर्ण व एक रौप्य पदक पटकाविले. कांचनच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.

जळगाव जिल्ह्यात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, या मुख्य उद्देशासाठी जैन इरिगेशनतर्फे जैन स्पोर्टस् अॅकॅडमीची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅकॅडमीतील खेळाडू कांचन योगेश चौधरी हिला शालेय शिक्षण घेत असताना दत्तक घेऊन जबाबदारी पत्करली. तिला स्विमिंगसाठी लागणारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन, किट जैन अकॅडमीने उपलब्ध करून दिले. कांचनच्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असताना शिक्षण व स्विमिंगचा सराव सातत्याने सुरू ठेवला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागही तिने नोंदवून चमकदार कामगिरी केली. क्रीडा क्षेत्रातील योगदानाला अधोरेखित करत स्वीमिंग क्रीडाप्रकारात महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा मानला जाणारा एकलव्य पुरस्कार देखील कांचन यांनी प्राप्त केला. खेळासोबतच त्यांनी एम. एस्सी. मायक्रो बायोलॉजीचा अभ्यासक्रम चांगल्या गुणांची प्राप्ती करत पूर्ण केला.
जैन उद्योग समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे संचालक अतुल जैन यांनी कांचन चौधरीला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कांचनला 7 ऑगस्ट 2017 मध्ये नोकरीवर घेतले गेले. जैनच्या विविध आस्थापनांमध्ये, प्रकल्पात मिळालेल्या नोकरी, रोजगार संधीमुळे कांचन सारख्या अन्य खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. नोकरी सांभाळून हे खेळाडू विविध स्पर्धेत सहभाग नोंदवितात व आपली चुणूक दाखवितात.
‘आपल्या खेळ व करियरला जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन परिवारामुळे उत्तम संधी मिळालेली आहे’ अशी प्रतिक्रिया कांचनने आवर्जून व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.
*फोटो कॅप्शन* – आपल्या सुवर्ण व रौप्य पदकासह जैन फार्म फ्रेश फूडस् लि. च्या सहकारी कांचन चौधरी







