जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे सहकारी आर्टिस्ट श्री. विजय जैन यांच्या चित्राची आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 103 व्या वर्षीच्या ऑनलाईन प्रदर्शनातल्या व्यावसायिक गटात निवड झाली आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही नावाजलेली संस्था दरवर्षी अखिल भारतीय पातळीवर चित्र प्रदर्शन आयोजित करत असते. या प्रदर्शनात 3600 कलाकृतितून चित्राची निवड होणे हाच एक बहुमान समजला जातो.


या वर्षीचे चित्र प्रदर्शन कोविड-19 विषाणूच्या साथीमुळे ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय पातळीवरील या चित्र प्रदर्शनात चार व्हर्च्युअल (आभासी) दालनात हे चित्र प्रदर्शित केली आहेत. कला रसिक या प्रदर्शनाचा आनंद 20 मार्च ते 5 एप्रील 2021 दरम्यान आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन घेऊ शकतात. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था 129 वर्षांपूर्वी 1918 साली स्थापन झाली. या प्रदर्शनात विद्यार्थी व व्यावसायिक असे दोन गट आहेत. सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत हे सध्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.
विजय जैन यांच्या 20 चित्रांचा एक समूह या प्रदर्शनात आपल्याला पहायला मिळेल. यात त्यांच्या चित्राचा आकार 32X40 इंच आहे. त्यांनी ही सर्व रेखाचित्रे लॉकडाऊनच्या काळात काढली आहेत. साहजिकच या काळात त्यांना सगळे रंग, कॅनव्हास आणि चित्रकलेचे साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळे त्यांनी ही चित्रे केवळ पेनने कागदावर काढलेली आहेत. त्यांची ही रेखाचित्रे या प्रदर्शनाच्या अगोदर जळगावच्या पु.ना. गाडगीळ कलादालनात ‘शोध’ चित्र प्रदर्शनात कलारसिकांना बघण्यासाठी 14 ते 28 फेब्रुवारी 2021 या काळात ठेवण्यात आलेली होती. त्यावेळीच अनेक प्रेक्षकांनी ती बघितली आहेत.
विजय जैन त्यांच्या चित्राला infiniteD इनफिनिट-डी असे संबोधतात. यामध्ये अनेक मिती आहेत. केवळ दोन मिती, त्रिमिती किंवा बहुमिती चित्र ते नाही. केवळ रेषांनी ते चित्र तयार करतात. या रेषांच्या मदतीने ते अनंत मिती काढतात. विजय जैन यांच्या चित्रांमध्ये दोन किंवा अनेक रेषांमधली जागा निवडतात व त्यांना या चित्रात वेगळा आकार आणि अर्थ दिसतो.
आर्टिस्ट विजय जैन आपल्या चित्राविषयी म्हणतात की माझ्या चित्राच्या रंगांच्या थरातून मी एक रेष घेतो आणि कलारसिकांना त्यात रंगांच्या छटा दिसतात. तसेच एका रेषेला दुसरी रेष जोडून प्रेक्षक वेगळी जागा आणि आकार त्या रेखाचित्रात पहातात. ते प्रेक्षकांच्या डोळयात समाधान आणि आनंद बघतात.
फोटो कॅप्शन – स्पर्धेसाठी विजय जैन यांनी सदर केलेली कलाकृति तर विजय यांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र







