नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मुकेश अंबानी याच्या घरासमोर स्फोटके सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएसकडे गेल्यानंतर प्रत्येक दिवशी यात नवनवीन माहिती उघड होत आहे. त्यातच आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच या प्रकरणात राज्य सरकारचे तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य असल्याचे वक्तव्य केले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचे सांगितले जात होते. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, ‘विदर्भामध्ये मिहान प्रकल्पामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शरद पवारांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, त्यासाठी संपूर्ण डिटेल्स देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली. या प्रकल्पामुळे विदर्भातील रोजगारात वाढ होईल.’







