मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत उत्तम रितीने कार्य करत आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, शासन त्यांच्या सदैव पाठीशी आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले.
मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमविरसिंह, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चोबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज, उपायुक्त मुख्यालय श्रीमती एन. अंबिका, उपायुक्त (संचलन) प्रणय अशोक, उपायुक्त (झोन 1) संग्रामसिंह निशानदार, उपायुक्त (झोन 2) राजीव जैन, उपायुक्त (एस.बी. 1) गणेश शिंदे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन 16-16 तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीसांच्या सुरक्षेबाबत आधुनिक अशा या आरोग्याबाबतच्या सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. हि बाब महत्त्वपूर्ण व अभिनंदनीय आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास त्याचा फायदा पोलिसांना आरोग्य सुरक्षा दृष्टीने नक्कीच होईल असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे जर एखादा पोलीस कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या कुटूंबीयांसाठी शासनाने 50 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. शासन पुर्णपणे पोलिसांच्या पाठिशी उभे आहे, याबद्दल पोलीस आयुक्त परमविरसिंह यांनी शासनाचे व गृहमंत्र्यांचे आभार मानले. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पाच हजार सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. त्याची प्रातिनिधीक सुरुवात गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.