जळगाव (प्रतिनिधी) – साथीचे रोग तसेच अन्य तत्सम आजारांना आळा बसावा, जनजागृती व्हावी आणि शासकीय आरोग्य यंत्रणा व जनतेत समन्वय साधण्यासाठी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली ही समिती म्हणजे अशा स्वरूपाचा हा राज्यातील पहिला उपक्रम ठरला आहे.
राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 23 डिसेंबर 2015 रोजी जी.आर. काढून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सेवा समन्वय समिती स्थापित करण्यात यावी असे निर्देश दिले होते. वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया किंवा साथीचे व संसर्गजन्य रोगांना (कोविड-19 सारखे) आळा बसविण्यासाठी, जनतेपर्यंत प्रभावी आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणा व खासगी दवाखाने यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा आरोग्य समन्वय समितीची स्थापना करण्यात यावी असे सुचविण्यात आले होते. हा शासन निर्णय होऊन सव्वा 4 वर्षे झाली तरी अद्याप राज्यात कुठेही ही समिती स्थापन करण्यात आली नसल्याचे समजते. सध्या कोवीड-19 विषाणूमुळे उडालेला हाहाकार पाहता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा आरोग्य समन्वय समितीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी 30 मार्च रोजी जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. या समितीचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल.
जिल्हा समन्वय समितीचे पदसिध्द अध्यक्ष पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पदसिध्द उपाध्यक्षा जि.प. अध्यक्षा सौ. रंजना पाटील व जळगावच्या महापौर भारती सोनवणे आहेत. सदस्यांमध्ये खा. उन्मेष पाटील व खा. रक्षा खडसे यांच्यासह आ.किशोर पाटील, आ.संजय सावकारे, आ. लताताई सोनवणे व आ. शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. पदसिध्द सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जि.प. सीईओ डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मराविम अभियंता श्री शेख, सा.बां. खाते उपअभियंता प्रशांत सोनवणे, उपसंचालक (आरोग्य सेवा, नाशिक) डॉ. म.रे. पट्टनशेट्टी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोतोडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पवन पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांचा समावेश आहे.
या समितीत खासगी क्षेत्रातील 10 नामवंत डॉक्टर्सचा समावेश आहे. यामध्ये डॉ. निलेश चांडक, डॉ. शीतल ओस्तवाल, डॉ. दीपक पाटील, डॉ. परिक्षीत बाविस्कर, डॉ. प्रताप जाधव, डॉ. स्नेहल फेगडे , डॉ. सारिका संजय पाटील ( सर्व जळगाव); डॉ. तुषार पाटील, डॉ. वैजनाथ चौधरी, डॉ. नयन महाजन ( सर्व भुसावळ) यांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील 2 अशासकीय सदस्यांंमध्ये पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. भूषण मगर आणि मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचा समावेश आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे नामनिर्देशीत मुकुंद देवपुरी गोसावी आणि पवन प्रकाश जैन यांना देखील या समितीत सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य समन्वय समिती महत्वाची असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांचा आढावा घेऊन त्रुटीं निराकरणाच्या उपाययोजना सुचविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरांसह जनजागृती मोहिमा राबविण्यासाठी ही समिती कार्यरत राहील. नियोजन समितीने मंजूर केलेल्या आरोग्य विषयक निधीतील खर्चाचा आढावा ही समिती घेणार आहे. खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये समन्वय साधण्याचे काम ही समिती करणार आहे. साथीच्या रोगाच्या प्रादूर्भावाच्या प्रसंगी प्रतिबंधक उपाय, रोगनिदान, चिकित्सा ; राजीव गांधी जीवनदायी योजनाच्या अंमलबजावणीची पाहणी तसेच आरोग्य संस्थांसाठी दुरूस्ती, पाणी पुरवठा आदींसाठी निधी उपलब्ध करण्याचे काम ही समिती करणार आहे.
जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या समन्वयाची महत्वाची जबाबदारी पार पाडली जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. या समितीची जळगावला लवकरच पहिली बैठक घेऊन कार्याची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.