नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे अगोदर पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे, या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय-व्यवसाय बंद करा- चूल फुका- खोटी आश्वासनं ऐकून पोट भरा!’ असं ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी या अगोदर इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं! असं म्हणत राहुल गांधींनी या ट्वीटमध्ये केंद्रातील भाजपप्रणीत सरकारवर टीका केली आहे. ‘जून २०१४ मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ९३ डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल ७१ तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होते.
गेल्या ७ वर्षांत कच्चं तेल ३० डॉलरने स्वस्त झालंय. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करतंय आणि डिझेल त्याच्या पाठपाठ जातंय’, असं या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय. ‘२०२१मध्ये १९ वेळा ही दरवाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झालं आहे’, अशी आकडेवारी देखील त्यांनी सादर केली.