मुंबई (वृत्तसंस्था) – विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड हे त्यांची पत्नी शीतल आणि मेव्हणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राठोड गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांकडून वेळ देण्यात आला नव्हता. आता उद्यापासून राज्याचं सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढत असलेला दबाव या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना भेटीची वेळ दिली आहे. त्यामुळे राठोड आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांकडे केवळ आपली बाजू मांडणार की मंत्रिपदाचा राजीनामा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.







