जळगांव, ;- गोष्ट सांगणे हा मानवी स्वभावाचा नैसर्गिक गुण असून कवितेच्या माध्यमातून न सांगता येणाऱ्या गोष्टी कथेच्या स्वरूपात मांडता येतात असे प्रतिपादन कथाकार बालाजी सुतार यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शनिवार दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘कथा : निर्मिती आणि सादरीकरण’ या विषयावर झालेल्या ऑनलाईन परिसंवादात ते बोलत होते.
गुगल मिट द्वारे झालेल्या या परिसंवादात लेखक बालाजी सुतार व संजीव गिरासे हे कथा निर्मिती वर बोलले. प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु. पगारे होते. बालाजी सुतार यांनी कथा नैसर्गिक स्वरूपात असावी त्यातील व्यक्तिरेखा स्वाभाविक असाव्यात असे सांगतांना वास्तववादी व काल्पनिक असे दोन कथा प्रकार असल्याचे सांगितले. संजीव गिरासे यांनी कथा रूचतात तशा लिहावाव्यात. कथांमधून अप्रत्यक्ष सामाजिक संदेश दिला जातो असे मत मांडले. अध्यक्षीय भाषणात प्रा. म.सु. पगारे यांनी कथा श्रवण करण्याची इच्छा निर्माण करत असल्यास ती कथा उत्तम ठरते असे मत व्यक्त केले. प्रा. बी.व्ही. पवार यांनी मराठी भाषेचा जागर या निमित्ताने होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नेत्रा उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. आशुतोष पाटील यांनी आभार मानले. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. मुक्ता महाजन, हिंदी विभागप्रमुख डॉ. सुनीक कुलकर्णी यांच्या समवेत इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.







