जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशाी संलग्नित जळगाव जिल्हयातील महाविद्यालयांचे नियमित वर्ग ६ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आले असून ऑनलाईन वर्ग सुरु ठेवले जाणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ई माहिती तयार करणे, परीक्षांचे व तत्सम कामे करण्यासाठी महाविद्यालयात उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर परिपत्रक प्रसिध्द केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्याप्रमाणे ५० टक्के विद्यार्थ्यांची रोटेशन पध्दतीने उपस्थिती ठेवून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत महाविद्यालये / विद्यापीठ प्रशाळा सुरु झाल्या होत्या. तथापि, कोविड रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने जळगाव जिल्हयातील महाविद्यालये बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाल्यामुळे नियमित महाविद्यालये सुरु करण्याची कार्यवाही ६ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या कालावधीत घेण्यात येणाऱ्या सर्व पूर्वनियोजित ऑनलाईन परीक्षा सुरु ठेवाव्यात असेही या परिपत्रकात विद्यापीठाने महाविद्यालयांना कळविले आहे.