जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पहिल्या टप्प्यात ६८ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी ५ लाख ६८ हजार ७६९ विषयांच्या परीक्षा यशस्वीपणे दिल्या. ५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन झालेल्या या परीक्षेत ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत. गतवर्षी अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन झाल्यानंतर आता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पहिल्या टप्प्यात व्दितीय व तृतीय वर्ष (पदवीस्तर), व्यवस्थापन पदवी, पदव्युत्तर सर्व विषय, अभियांत्रिकी व फार्मसी तृतीय व चतुर्थ वर्ष (सत्र ५ ते ८) या परीक्षांचा अंतर्भाव होता. ५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध विषयांच्या ५ लाख ६८ हजार ७६९ विषयांच्या झालेली ही परीक्षा ६८ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने दिली. या झालेल्या परीक्षांमध्ये ज्या विषयांना प्रात्यक्षिक परीक्षा नाहीत त्यांचे निकाल जाहिर करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. या सर्व परीक्षांचे आयोजन विद्यापीठाने स्वत: केले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परीक्षांसाठी परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, सर्व अधिकार मंडळे, विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व आयटी को-ऑर्डीनेटर यांच्या सहकार्यामुळे या परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या.
दरम्यान शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या टप्प्यात पदवी व पदविकास्तरावरील प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान, प्रथम वर्ष समाज कार्य, पदवीस्तरावरील व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम, डी.पी.ए., बी.ए.एम.सी.जे., बी.पी.ई., बी.व्होक या अभ्यासक्रमांच्या परीक्षा तसेच विधी अभ्यासक्रमाच्या एल.एल.बी. आणि एल.एल.एम.च्या सत्र एक वगळता इतर परीक्षा २ मार्च पासून घेतल्या जाणार असून या सर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या परीक्षांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या परीक्षा २५ मे पासून घेतल्या जाणार आहेत अशी माहिती
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.