इस्लामाबाद ( वृत्तसंस्था ) ;- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधी पक्षातील एका खासदाराने आपल्यापेक्षा वयाने जवळपास 50 वर्ष लहान मुलीशी लग्न केले आहे. मौलाना सलाहउद्दीन अयूबी असे या 62 वर्षीय खासदाराचे नाव आहे. यावरून संसदेत राडा झाला, तसेच लोकं रस्त्यावर उतरली आहेत. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाने यावरून राडा घातला आहे. यामुळे विरोधक बॅकफूटवर गेले आहेत.
वृत्तानुसार, मौलाना सलाहउद्दीन अयूबी हे बलुचिस्तानमधील चित्राल येथून खासदार पदावर निवडून गेले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी 14 वर्षांच्या एका मुलीशी निकाह केला होता. प्रकरण तापल्यानंतर मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळाने तिचा जन्मदाखला देखील सार्वजनिक केला. यात तिची जन्मतारिख 28 ऑक्टोबर, 2006 दिसत आहे. यावरून एका सामाजिक संस्थेने त्यांच्याविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, खासदाराने आपल्या पदाचा वापर करत आणि वजन वापरून मुलीच्या वडिलांवर दबाव टाकला. यामुळे पोलीस चौकशीत वडिलांनी मुलीचे लग्न झालेच नाही, असा सूर आळवला. यामुळे तपास रखडला आहे. परंतु आता सत्ताधारी पक्षानेही यावरून आवाज उठवला असून लोकंही रस्त्यावर उतरली आहेत.