जालना (वृत्तसंस्था ) घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील समर्थ बेकरीत काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचा झोपेतच गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना 22 फ्रेब्रुवारी रोजी सोमवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर बंडू शेडगे (वय -24, रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तीर्थपुरी येथे शहागड रोडवर रामहरी तुळशीराम सुरोसे (रा. कृष्णनगर, साडेगाव ता.अंबड) व संतोष बापूसिंग परदेशी (रा. कडाआष्टी ता. जि. बीड) या दोघांच्या मालकीची समर्थ बेकरी आहे. दुकानावर मयत ज्ञानेश्वर शेडगे तीन वर्षांपासून कामाला होता. बेकरीत ज्ञानेश्वरसह बेकरी मालक संतोष परदेशी यांचा मेव्हणा दिगंबर जमादारसिंग परिहार (रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड), सचिन पांडुसिंग परदेशी (रा. सोनई ता. नेवासे जी. नगर) हे झोपत असे.
घटना घडल्याच्या दिवशी दिगंबर परिहार हा काही कारणाने गावाकडे गेला असल्याने बेकरीवर मयत ज्ञानेश्वर शेडगे व सचिन परदेशी हे दोघेच होते. सचिन परदेशी याने दिलेल्या माहितीनुसार, लघुशंकेला बाहेर गेलो असता पाठीमागील दरवाजा जवळून दोघेजण पळून जाताना दिसले. परत आत आल्यावर ज्ञानेश्वर हा बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आला.