शिरसोली (प्रतिनिधी);- येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि नाश्ता सेंटर मध्ये अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे .


मंगळवार १६ रोजी मध्यरात्री शिरसोली प्र.न. येथिल ग्रामपंचायतीचे लोखंडी टीक्कमने कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी ग्रामपंचायतीच्या मालकीचे दवंडी देण्याचा माईक व मॉनिटर असा अंदाजे पाच हजाराचा माल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शॉपिंग मधील प्रकाश नामदेव लावणे यांच्या मालकीचे नाष्टा सेंटरचे कुलूप तोडून दोन हजारांची चिल्लर असा अंदाजे एकुण सात हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला आहे. आज सकाळी सात वाजता नेहेमीप्रमाणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी चंद्रभान बारी,ज्ञानेश्वर पाटील,उमाकांत माळी हे ग्रामपंचायत उघडण्यासाठी आले असता यावेळी ग्रामपंचायतीचे कुलूप लोखंडी टीकमने तोडून फेकलेले दिसले. यावेळी चोरी झाली असल्याचे समजले गावातील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी कळविल्याने घटनास्थळी लागलीच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक विशाल सोनवणे, हवलदार राजेंद्र ठाकरे,निलेश भावसार दाखल झाले. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.







