मुंबई (वृत्तसंस्था) – बीडमधील परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातीत राजकीय वातावरण ढवळून निघालंय. तसेच पूजाच्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केलाय.
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही म्हणत अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून अनेक मुद्यांवर भाष्य केलंय.
”धनंजय मुंडेंवर ज्यांनी आरोप केला. त्यांनी नंतर स्वतः चॅनेलसमोर येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझं स्टेटमेंट करतेय, असं सांगितलं. एखाद्या नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी बराच काळ-वेळ घालवावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात. परंतु आरोप करणारा कशाही पद्धतीने आरोप करू शकतो. मग त्याही खोलात गेलं पाहिजे”, असा टोलाही अजित पवार यांनी विरोधकांना लगावलाय. चौकशी पूर्ण होण्याच्या आधी काही लोक आरोप करतात. त्याला काही अर्थ नाही, असंही अजित पवार म्हणालेत.
पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आरोप केला, तेव्हा त्यावेळेस त्यांना मुद्दामहून आरोप करायला भाग पाडलं होतं का?, असे बरेच काही त्याच्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात. धनंजय मुंडेंचं प्रकरण आता मिटलं आहे. पण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.