जळगांव ;- आपण करीत असलेले काम, सभोवतालची सामाजिक परिस्थिती यामुळे ताणतणावात वाढ होण्याची शक्यताअसते. अशावेळी नेमक्या कोणत्या कारणामुळे ताण वाढला आहे याचा प्राथमिक पातळीवर शोध घेत मित्रांशी अथवा समुपदेशकाकडे जाऊन यावर चर्चा करावी असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर गुरुवारी डॉ.जोशी यांचे व्याख्यान झाले. डॉ.मनिष जोशी व डॉ.प्रशांत सोनवणे यांना आयसीएसएसआरचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला असून या प्रकल्पांतर्गत डॉ.जोशी यांचे व्याख्यान झाले. डॉ. प्रदीप जोशी यांनी व्याख्यान व प्रश्नोत्तरात सांगितले की, तणावामुळे तणावामुळे शरीरावर व मनावर परिणाम होत असतात. कुठल्याही व्यसनामुळे ताण नाहिसा होत नाही उलट वाढतच जातो. त्याकरीता योग्य वेळी तज्ज्ञांकडून उपाययोजना करणे, प्राणायाम, योगसाधना, अंतर्गत संवाद साधणे अशा काही गोष्टी आवश्यक आहेत. पालकांकडून मुलांवर अपेक्षांचे ओझे लादल्यामुळे मुलांवर तणाव येत असतो. डॉ.जोशी असेही म्हणाले की, सोशल मिडीयाच्या जास्त वापरामुळे देखील ताणतणावात वाढ होत असते. अमेरिकेतील संशोधनाचा आधार घेत त्यांनी सांगितले की दिवसातून केवळ २ तास पेक्षा अधिक वेळ गॅझेटस़चा वापर टाळावा. यासह अनेक उदाहणासह डॉ.जोशी यांनी ताणतणाव व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी डॉ.प्रशांत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ.मनिष जोशी यांनी तर सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








